श्रावण मी ...

*श्रावण...!!*
रोज तुझ्या  डोळ्यांत नव्याने
रिमझिमणारा श्रावण मी,
आठवणींच्या गंधफुलांनीं
दरवळणारा श्रावण मी.. !!

हिरवळलेल्या वाटेवरती
एकटीच तू फिरताना,
पाऊसओल्या गवतांवरचे
थेंब टपोरे टिपताना,
तुझ्या मनाच्या हिरव्यारानी
भिरभिरणारा श्रावण मी,
आठवणींच्या गंधफुलांनी
दरवळणारा श्रावण मी...!
फांदीवरल्या झोक्यावरती
उंच उंच तू झुलताना,
मेंदी भरला नाजूक हात
हळूच पुढे तू करताना,
तुझ्या गुलाबी ओठांवरती
थरथरणारा श्रावण मी,
आठवणींच्या गंधफुलांनी
दरवळणारा श्रावण मी...!
पावसातले दिवस आपुले
शोधतेस तू आज जिथे,
तुझे नि माझे गीत कालचे
ऐकतेस तू आज जिथे,
तिथेच कोठेतरी अजूनही
मोहरणारा श्रावण मी,
आठवणींच्या गंधफुलांनी
दरवळणारा श्रावण मी..!!
*विंदा करंदीकर.*
श्रावण मी ... श्रावण मी ... Reviewed by spanankavitaa on 11:07 Rating: 5

Follow Us

Powered by Blogger.